27 November 2014

शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”

“आनंदवन” विषयी थोडं......!!!
पुस्तकाचे नाव : शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”          लेखक: फारूक एस. काझी.    प्रस्तावना:   भाऊसाहेब चासकर.      प्रकाशक :एकनाथ गुरव. “अंकुर” गट.सांगोला.जिल्हा:सोलापूर.      किंमत:१२०/- रु.                     पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध  आहे.         संपर्क : 8275459276 ( फारूक काझी )    किंवा     माझ्याशी  संपर्क साधा  :  9623344643  ( प्रशांत क-हाडे )
 आनंदवन ही कथा आहे एका जिल्हा परिषद शाळेत नव्याने रुजू झालेल्या तरुण व काहीतरी करू पाहणाऱ्या धडपड्या शिक्षकाची...यात नाट्य नाही. पण अनुभव जरूर आहेत.एकट्याने एखादे काम करताना येणाऱ्या अडचणी काय असतात तसेच मोडून पडण्याचे क्षण कसे असतात हे यात अनुभवायला मिळेल. तसेच मार्ग शोधताना होणारी घुसमट,त्रास अन त्याचसोबत मित्रांची साथ हे सर्व ही अनुभवायला मिळेल.असं एकटं असताना मनात नकारात्मकता भरणं साहजिक आहे. कारण ती स्वाभाविक मानसिकता आहे. पण हीच नकारात्मकता माणसाला काम व आवड या दोन्हीपासून दूर नेते.आनंदवनमध्ये सकारात्मक विचार आपली सर्जन व सृजनशीलता कशी फुलवते याचा अनुभव घ्याल.
सरकारी शाळातून चालणारे प्रयत्न लोकापर्यंत पोचत नाहीत.कारण आपण जे करतोय किंवा करून पाहिलंय हे तितकसं महत्त्वाचं नाहीय असंच वाटत राहतं. आनंदवन अशाच प्रयत्नांची कहाणी आहे. यात सोपे सोपे प्रयोग आहेत त्यासोबतच प्रेरणाही आहे. यात असलेला शिक्षक मंजे दुसरं तिसरं कुणी नसून आपणच आहोत, असाच अनुभव येईल.सरकारी शाळांनी समाजातील अनेक पिढ्यांना घडवलंय.मात्र आता अचानक या शाळाविषयी इतका अविश्वास का निर्माण झाला? याचं उत्तर आपण सर्वांनी शोधून काढायचंय. आनंदवन सरकारी शाळेचं व व्यवस्थेच्या चौकटीत अडकवून टाकण्यात आलेल्या शिक्षकाच्या घुसमटीचीही कहाणी आहे. काही तरी करून दाखवण्याची धमक सर्वांत आहे. पण परिस्थिती अनुकूल नसते.चुकून शाबासकीही वाट्याला येत नाही.तरी कुणाला दोष न देता आपली अंत:प्रेरणा कायम ठेऊन काम करत राहणाऱ्या व आपल्या सोबत सर्वांना नेऊ पाहणाऱ्या एका शिक्षकाची ही कथा.
सरकारी शाळांचं अस्तित्व कायम राहणार आहे.यात वाद नाही.पण त्यासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा आहे.त्याशिवाय सरकारी मराठी माध्यमाच्या शाळा समाजाच्या विकासात आपला वाटा उचलू शकणार नाहीत. अमेरिकेचं येता जाता अनुकरण करणारे आपण हे विसरतो की तिथं सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणे हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं.आपल्याकडील चित्र उलट आहे.आपल्याकडे सरकारी शाळा ह्या हलक्या समजल्या जातात.एकदा या शाळांवर विश्वास ठेऊन पाहूया. त्या केवळ गरीबांच्या नव्हे तर समाजाच्या प्रत्येक स्तराला सामाऊन घेणाऱ्या समाजाच्या “आई” आहेत.ही त्या आईची कहाणी आहे.“मराठी शाळा कशी आपल्या जीवनविश्वाचा भाग असते हे चित्र इथे पाहायला मिळते.” इथे स्वप्नं आहेत.धड-पडणं आहे.
भाऊसाहेब चासकर या धडपड्या शिलेदार शिक्षकाची प्रस्तावना,एकनाथ गुरव या हरहुन्नरी शिक्षकाचं प्रकाशकपण, तसेच . 2 रीच्या पाठ्यपुस्तकात ज्यांचा “मला वाटते” हा पाठ समाविष्ट आहे त्या फारूक काझी या शिक्षकाचं अनुभव कथन हे या पुस्तकाचं आणखी एक विशेष.


पुस्तकाचे नाव :शिकण्याच्या वाटेवरचं “आनंदवन”          लेखक: फारूक एस. काझी.       प्रस्तावना: भाऊसाहेब चासकर.      प्रकाशक :एकनाथ गुरव.“अंकुर” गट.सांगोला,जिल्हा:सोलापूर.      किंमत:१२०/- रु.                     पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध  आहे.         संपर्क : 8275459276 ( फारूक काझी )    किंवा     माझ्याशी  संपर्क साधा  :  9623344643  ( प्रशांत क-हाडे )

1 comment:

prashant karhade said...

आपले अभिप्राय ईथे द्या.